घराला लागलेल्या भीषण आगीत २० लाखांची रोख आणि सोन्याचे दागिने जळून खाक

Foto
हैद्रबाबाद : तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यात शनिवारी एका घराला अचानक भीषण आग लागली. ही दुर्घटना दौलताबाद मंडळातील बांदीवाडा गावात घडली, जिथे बांदी अंजप्पा यांच्या घरात आग इतक्या वेगाने पसरली की कुटुंबाला सावरण्याची संधीच मिळाली नाही. या घटनेत २० लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास ही आग लागली. पाहता पाहता आगीने संपूर्ण घराला विळखा घातला आणि घरातील सामान जळू लागलं. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, नवीन घराच्या बांधकामासाठी घरात २० लाख रुपयांची रोकड ठेवली होती. याशिवाय सोन्याचे दागिने आणि घरातील इतर साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलं.

आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आगीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला.

प्राथमिक अंदाजानुसार, विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप आग लागण्याच्या मुख्य कारणाला दुजोरा दिलेला नाही. घटनास्थळावरून पुरावे गोळा केल्यानंतर आणि सखोल तपासानंतरच आगीचं अचूक कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.